हळदीच्या कार्यक्रमात राडा चुलत भावाचा भोसकून खून !

Foto

औरंगाबाद : भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमात सख्या चुलत भावांचा नाचण्यावरून वाद झाला. तो वाद विकोपाला गेल्याने एकाने दुसर्‍याच्या छातीत चाकू खुपसल्याने 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास चिकलठाण्यातील ऋषिकेशनगर येथे घडली. आकाश मारोती शेळके (रा. गल्‍ली नंबर 16, संजयनगर, मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपी सचिन शेळके याला पोलिसांनी मुंबईत ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून सचिन दशरथ शेळके आणि त्याचा चुलत भाऊ आकाश मारोती शेळके यांच्यात वाद होता. आकाश हा सेंट्रिंगचे काम करतो तर सचिन सिडकोतील महाविद्यालयात शिकत आहे. या दोघांच्या भाचीच्या हळदीचा कार्यक्रम शुक्रवारी साडे दहाच्या सुमारास चिकलठाण्यातील ऋषिकेशनगर येथे सुरू होता. त्यात दोघांचा नाचण्यावरून पुन्हा वाद झाला. वाद वाढल्याने सचिन शेळके याने आकाशच्या छातीत चाकू खुपसला. जखमी आकाशला नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. या घटनेची नोंद एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास प्रकाश घुगरे करत आहेत. मुंबईतून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आकाश शेळके याची हत्या केल्यानंतर आरोपी सचिन शेळके हा पसार झाला होता. तो नवी मुंबई येथील वाशी येथे लपून बसला असल्याची माहिती खबर्‍याच्या मदतीने पोलिसांना मिळाली. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या एका पथकाने वाशी येथे सापळा रचत आरोपी सचिन शेळकेच्या मुसक्या आवळल्या. आज संध्याकाळपर्यंत त्याला औरंगाबादेत आणले जाणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली.